शनिवार, १२ मार्च, २०२२

मोर आणि देवी सरस्वती


बाबीला मोर खूप आवडतो. तिच्याकडे अनेक प्रकारचे मोर आहेत अन ती  त्यांना प्रेमाने वागवते. 

मोर आवडण्याचे एक कारण म्हणजे देवी सरस्वती मोरावर बसते. (देवी सरस्वती कमळावर बसते हेही तिने पाहिले आहे)

त्यामुळे मोर हाताला लागला, की बाबी त्याच्यावर बसण्याचा प्रयत्न करते. 

जीजी: अगं, काय करतेस, टोचेल ना तो पिसारा/मोराची टोकदार शेपटी? 

बाबी: मी सरस्वती देवी आहे ना!






जीजीला लहानपणी वाचलेले आणि मनात कोरले गेलेले थॉमस अल्वा एडिसनचे चरित्र आठवले. लहानगा एडिसन कोठे गेला, म्हणून सर्वजण त्याला शोधत होते, तेव्हा तो गोठ्यात अंड्यांवर बसलेला सापडला. आई म्हणाली अरे काय हे! काय करतो आहेस! एडिसन म्हणाला, कोंबडीसारखे अंड्यांवर बसून पिल्ले बाहेर येतात का बघत होतो. 

जिजीची बाबीही अशीच आहे एडिसन सारखी बुद्धिमान, प्रयोगशील, बारकाईने निरीक्षण करणारी, त्यावरून स्वतःचे आडाखे बांधणारी. देवी सरस्वती!


शुक्रवार, ११ मार्च, २०२२

सिंहासन


बाबी म्हणाली, जीजी मला आसन दाखव. 
जीजीने आश्चर्याने विचारले, आसन?

बाबींच्या लक्षात आले की जीजीला काही समजले नाही. तिने टीपॉयवरचे राजहंसचे ग्रंथवेध मासिक उचलले आणि  जीजीला म्हणाली इथे बस माझ्या शेजारी. (बाबी जीजीला अगदी चिकटून बसते, सोफ्यावर खूप जागा असली तरी. बहुधा ही प्रेम किंवा सुरक्षितता व्यक्त करण्याची पद्धत असावी.)

तिने ग्रंथवेधचे मधले पान उघडले आणि जीजीच्या डोक्यात प्रकाश पडला. परवाच तर त्या  दोघींनी ते पान पाहिले/वाचले होते. 

त्या पानावरच्या फोटोमध्ये पाटलीपुत्राच्या राजपुत्राचे सिंहासन आहे. सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना सिंहाचे डोके दिसते. ते दाखवून जीजीने सिंहासन हा शब्द उच्चारला होता. बाबीने मात्र आसन हा सुटसुटीत शब्द लक्षात ठेवला आणि त्याचा उपयोग करून पाहिला. 

त्या पानावरच्या राजपुत्राच्या हातातील तलवार पाहून ती  फारच प्रभावित झाली होती. तो काय करतोय? इथपासून या तीनही चित्रांत तोच आहे याची शहानिशा करून घेतली. बाबीच्या निरीक्षणाला सलाम!
 





























चित्रातील हत्ती पाहून मात्र आधी तिला वाटले त्याच्या पायाला काही झाले का? (पाय मोडला का?) पण हत्तीनेच फुलापानांना पायाखाली तुडविले आहे, त्याचे पाय ठीक आहेत त्यांना काही झालेलं नाही हे ऐकून तिला बरं  वाटलं. कारण मोराप्रमाणेच हत्ती हा देखील बाबींचा आवडता प्राणी आहे 

(पण  जीजीला मात्र वाटलं, कशाला आत्ताच हे युद्ध, तलवार, तुडविणे .... तिच्या नजरेला आणून द्यावे?) 

मंगळवार, ८ मार्च, २०२२

चकचकीत


एकदा जीजीला कामात मदत करणाऱ्या संजनाबाईने वेळ काढून शोकेस मधील पितळी मूर्ती पितांबरी लावून चकचकीत केल्या. 
बाबी आल्यावर तिच्या नजरेला तो बदल लगेच जाणवला. तिने आनंदाने, हसऱ्या चेहेऱ्याने  जिजीकडे पाहिले. 

जीजी: बाबी, आपल्या मूर्ती बघ कशा चकचकीत दिसताहेत! 
बाबी: कश्या झाल्या चकचकीत? (लगेच नवीन शब्दाचा वापर )
जीजी: संजना मावशीने पावडर लावून घासल्या!
त्या सुंदर चकाकणाऱ्या मूर्ती बघून बाबीला खूपच आनंद झाला. 

दोन तीन दिवसानंतर जीजीने शोकेसच्या पुढे ठेवलेल्या मोठ्या टी टेबलवरचे बरेचसे सामान उचलले. आता ते टेबल खूपच साफसुथरे दिसू लागले. त्यावर बरीच जागाही झाली. 

बाबी आल्या आल्या उद्गारली, 'हे टेबल कोणी चकचकीत केले? संजना मावशीने? 
मूर्ती चकचकीत, टेबल चकचकीत .... शब्दांचा लगेच वापर करून बघते बाबी. बऱ्याचदा अगदी योग्य, समर्पक 

जीजी: नाही नाही, मी केलं ते टेबल चकचकीत. 
बाबीला ते काही पटे ना. ती म्हणत राहिली 'संजना मावशीने केले चकचकीत' 

जीजी म्हणाली (अर्थात मनातल्या मनात) आता काम कोणी केले आणि क्रेडिट कोणाला!


बाबीचे निरीक्षण मात्र अतिशय आश्चर्य वाटण्यासारखे आहे. 

पणजीच्या बेडवरचे कव्हर ७-८ दिवसांनी बदलले जाते. 
ते बदलले आहे हे जीजीच्या लक्षात असते कारण तीच ते बदलते. पण कव्हर बदलले आणि बाबी आली की पहिला प्रश्न. चादर बदलली? कधी? (म्हणजे काल रात्रीपर्यंत तर नव्हती बदललेली. 

जीजीला जीजीच्या घरातच झालेले बदल लक्षात येत नाहीत. पणजी तिला म्हणते तू तुझ्या कामांमध्ये इतकी गुंतली आहेस की या गोष्टींकडे तुझं लक्षच नसतं.

पण बाबीचे तसे नाही. ती सतर्क आहे 
असो! 

शनिवार, ५ मार्च, २०२२

सौंगडी (सवंगडी)


'नाच रे मोरा' या गाण्यावर नाच करताना शेवटच्या कडव्यात 'निळ्या सौंगड्या नाच' अशी शब्द रचना आली. 

बाबी: सौंगड्या म्हणजे काय जीजी? 
जीजी: सौंगडी म्हणजे मित्र, मैत्रिणी. 
बाबी: निळ्या सौंगड्या कोण?
जीजी: निळा सवंगडी म्हणजे मोर. मोर निळा असतो ना? आणि त्याच्याबरोबरच तर नाच चाललाय. 
बाबी: माझा सौंगड्या लाल आहे (अजूनही सौंगड्या चे सवंगडी झाले नाहीच). 

म्हणजे ती आज ज्या मोराबरोबर नाचतोय तो लाल दिसतोय. बाबींकडे निळे मोर ८-१० तरी असतील, पण आजचा सवंगडी लालच. असो. 

त्या एका कवितेत किती बदल करावे लागणार आहेत देव जाणे! 😀😀

'देव जाणे' वरून आठवलं. हे गीत कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी 'देवबाप्पा' या सिनेमासाठी लिहिले, सिद्धहस्त संगीतकार श्री. पु. ल. देशपांडे यांनी त्यावर संगीताचा साज चढवला आणि स्वर्गीय आवाजाची देन असलेल्या आशाताईंनी ते आपल्या सुमधुर आवाजात गायले. 'देवबाप्पा' सिनेमा १९५३ मध्ये रिलीज झाला. 
 
या सिनेमात काम करणारी छोटी मुलगी म्हणजे मेधा गुप्ते. मी इंटर सायन्ससाठी गोव्याच्या धेम्पे कॉलेजमध्ये शिकत असताना (१९६८-६९) ती  MBBS करीत होती पण त्यांच्या मेडिकल कॉलेजचे हॉस्टेल नसल्यामुळे आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत होती. त्यामुळे ती माझी हॉस्टेलमेट. 

बाबीमुळे या ५०-५२ वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. 

शुक्रवार, ४ मार्च, २०२२

बाबीचा नकाराधिकार


बाबीला एखादी गोष्ट करायची नसेल, किंवा आवडली नसेल तर ते दर्शवण्याचे विविध मार्ग तिच्याकडे आहेत. 

त्यातला एक म्हणजे शब्दांशी खेळणे. मोठ्या माणसांनी होकारार्थी वाक्य केले असेल तर त्याचे नकारार्थी वाक्य करून निषेध दर्शविणे. आणि याच्या उलटही. 

बाबी, असं करायचं नसतं, असं जीजी म्हणाली की बाबी रागावली असल्यास आलेच निषेधाचे वाक्य: "असं करायचं असतं"

जीजी: बाबी, बूट न घालता गॅलरीत उतरायचं नसतं, माहीत आहे ना तुला? 
बाबी : बूट न घालता गॅलरीत उतरायचं असतं. 

जेव्हा गॅलरीत उतरायचं मनात असतं तेव्हा काही वाद न घालता बूट घालून बाबी तयार असते. 

जीजी: बाबी, दूध पटापट पिऊन संपवायचं असतं. 
बाबी: दूध पटापट पिऊन संपवायचं नसतं.  

बाबी एकावेळी नीट लक्षात ठेऊन दोन वाक्यांवरही प्रयोग करते. 
जीजी: बाबी, तुला खीर आवडते ना? मग चल, खीर चटकन पिऊन टाक. 
बाबी: मला खीर आवडत नाही (हे खरं तर खोटं आहे, बाबीला खीर आवडते, पण आता रागावल्यामुळे ती आवडेनाशी झाली). खीर चटकन पिऊन टाकायची नसते. 

बाबी दोन नकारार्थी वाक्येही लीलया होकारार्थी करते. 

या पेक्षाही दैदिप्यमान कार्य म्हणजे एक होकारार्थी आणि दुसरे नकारार्थी वाक्य असेल तरीही  बाबी योग्य प्रकारे निषेध नोंदवतेच.  

जीजी: बाबी, पणजी मोठी आहे ना? मग तिला त्रास द्यायचा नाही. 
बाबी: पणजी मोठी नाही. तिला त्रास द्यायचा असतो. (हे केवळ राग आला असतानाच. एरवी पणजी म्हणजे फारच जवळची मैत्रीण)

कितीही मोठे वाक्य असले तरी बाबी ते अचूकपणे रिपीट करते. 

क्या बात है बाबी! You are just great! 

How does she process such complicated information and express herself (her anger, her refusal to do something, refusal to act on the orders of elders etc.) correctly, effectively and efficiently!

गुरुवार, ३ मार्च, २०२२

मोराचा पिसारा


बाबीला नाच करायची लहर आली. 'नाच रे मोरा' हे आवडते गाणे. 

जीजी आणि बाबी गाणे म्हणत होत्या आणि बाबी नाच करीत होती. 

काळा काळा कापूस पिंजला रे ... 

बाबी: जिजी, काळा काळा कापूस म्हणजे काय? आपला कापूस पांढरा आहे ना? 
जीजी म्हणाली, काळा कापूस म्हणजे ढग, बाबी. (पण आता जून महिन्यापर्यंत त्या काळ्या कापसाची वाट पाहावी लागणार!)
बाबी अतिशय शहाण्या मुलीसारखी म्हणाली, 'काळा कापूस म्हणजे ढग'




बाबीला तेवढ्यात तिचा मोर (पितळेचा मोर) दिसला. त्याला झाडाखाली ठेऊन तिने नाच पुढे चालू ठेवला. 


(ते हिरवे दिसते ते झाड आहे बरं का! त्याच्याखाली ससा म्हणून ती झोपण्याचेही नाटक वठवते). 










तर जीजी म्हणत होती 

आता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच ... 





लगेच बाबीची ऑर्डर. जीजी त्याने पिसारा फुलवला आहे, त्याला पिसारा फुलवायला नको सांगू. 




आता काय करावे जीजीने!

मांडिला म्हणजे काय, जीजी?

परवा बाबीला गाणे म्हणायचा मूड आला होता. "ऐलमा पैलमा गणेश देवा" 

पुढची ओळ म्हणत होती. 

माझा खेळ मांडीवर, करीन तुझी सेवा

जीजी: बाबी, मांडीवर नाही, मांडिला. 'माझा खेळ मांडिला' असं आहे ते. 
बाबी: जीजी, मांडिला  म्हणजे काय? 

बाबीला 'मांडीवर' म्हणजे काय ते चांगलं ठाऊक होतं  पण 'मांडिला' हा  शब्द नवीन (आणि आता तर हा कोणी वापरतही नसेल.)

बाबीला एखाद्या शब्दाचा अर्थ माहीत नसला तर ती लगेच त्याचा अर्थ काय हे विचारते. हे किती चांगले आहे!

शाळेत गेली की हे विचारणे बहुधा कमी कमी होत जाते, "गप्प बस, किंवा 'मूर्खासारखं काहीतरी विचारू नकोस', किंवा 'एवढेही तुला माहीत नाही? कठीण आहे' अशी मुक्ताफळं ऐकली की बाबी हा प्रश्न विचारायचे थांबवेल. 

एक चांगले आहे, आता नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाने विद्यार्थ्यांमध्ये चौकस बुद्धी निर्माण करण्याला महत्व दिले आहे!

बाबीने हे वाचले तर ती विचारेलच "चौकस बुद्धी म्हणजे काय, जीजी?"


बुधवार, २ मार्च, २०२२

पणजी आणि पंचा


जीजीच्या आईला बाबी पणजी म्हणते. म्हणजे उच्चार पंजी असा करते. तिचे बहुतेक व्यवहार पंजीच्या  बेडवर चालतात. कारण पंजीचा बेड आहे खूपच ऐसपैस आणि हुंदडायला खूप जागा. पंजी आणि बाबी यांच्या वयातही केवळ ८९-९० वर्षांचेच अंतर असल्यामुळे त्या दोघींचे चांगले जमते. 

एकदा बाबीला पणजीची गंमत करावीशी वाटली. 

बाबी म्हणाली मी आता पंजीला पंचा  म्हणणार. आपण पंजीला  पंचा  म्हणू या.
(दुसऱ्या वाक्याने सर्वांना आपल्या निर्णयात बळेच सामावून घेण्याचा प्रयत्न)

जीजी म्हणाली, वा गं, असं नाही म्हणायचं. म्हणजे तू पंजीला पंचा म्हणतेस, मग मला टॉवेल म्हणशील. 
दुसऱ्याच क्षणी बाबी म्हणाली, हो, आणि मी रुमाल!

काय कमाल आहे बाबीच्या information processing ची. 

How swiftly and correctly did she match the Category and size!
ती रुमाल म्हणाली स्वतःला, लहान आकार म्हणून पण पंचा, टॉवेलच्या Category ला न सोडता!

वाह बाबी! 

मंगळवार, १ मार्च, २०२२

गाण्याचा दिवा



बरेचदा बाबीला एखाद्या वस्तूचे नाव माहीत नसते, पण त्यासाठी थांबून राहील ती बाबी कसली! ती स्वतःच शब्द तयार करते. आराधना मधला तो प्रसिद्ध डायलॉग आठवतो का? 'लबसे क्या? मतलब समझ गए ना?' 

जीजीकडे हॉलमध्ये छताला सुंदर झुंबर टांगले आहे. इलेकट्रीसिटी सुरु केली की झुंबरातील सर्व दिवे लागतात. आणि ते सतत रंग बदलत फिरू लागते. ब्लूटूथ वापरून त्यावर Youtube वरची गाणीही ऐकता येतात. बाबीची रोज निवडक गाण्यांची फर्माईश असतेच. 

त्याला झुंबर म्हणतात हे काही बाबीच्या  कानावर पडले नव्हते. एकदा फर्माईश करताना बाबी म्हणाली जीजी, तो गाण्याचा दिवा लाव ना!

किती सुंदर शब्दयोजना! आणि अतिशय समर्पक.... गाण्याचा दिवा

चमचा


स्थळ जीजीचे स्वयंपाकघर. वेळ दुपारच्या जेवणाची. १ वाजला आहे. 

जीजीने एक छोटेसे पातेले गॅसवर ठेवले होते. त्यात थोडीशी आमटी होती म्हणून ती ढवळण्यासाठी छोटा चमचा त्यात घातला होता. 

बाबीला स्वयंपाकघरात जीजीच्या कडेवर बसून, आजूबाजूला घडणाऱ्या सर्व क्रिया पहाण्याची फार आवड. 
तर बाबी आली, जीजीच्या कडेवर चढून बसली. 

गॅसवरच्या पातेल्याकडे बोट दाखवून म्हणाली 'हे काय आहे?'
जिजी : 'आमटी आहे ती बाबी'   
बाबी: 'पण तो चमचा आमटीचा नाही आहे, काढ तो!' 

जीजी बेशुद्धीच्या अवस्थेत! 
आमटीचा चमचा? ओ! डाव? म्हणजे आता शॉर्टकट  घेऊन चालणार नाही. अतिशय अचूक निरीक्षण क्षमता असलेली बाबी कडेवर बसली आहे! जीजीने मुकाट्याने चुकीचा (!) चमचा काढून 'आमटीचा चमचा' पातेल्यात घातला. 


चमच्यावरून आठवलं... 

तेलाच्या वाटीतला छोटासा चमचा नजरेसमोर आल्यावर बाबी इतकी खुष झाली! म्हणाली, 'हे तर पिल्लू आहे चमच्याचे'. 
(मनीमाऊच्या पिल्लाचे गाणे आणि कौतुक ऐकून बहुधा ही पिल्लाची कल्पना तयार होत असावी.)

पक्ष्यांना/ प्राण्यांना पाय किती?


संध्याकाळी ६ ची वेळ. स्थळ जीजीच्या घराचा हॉल. बाबीला प्रचंड झोप येतेय पण झोपायचे मनात नाही. जीजी तिला कडेवर घेऊन २-३ फेऱ्या मारेल आणि बाबी झोपी जाईल याची आत्तापर्यंतच्या अनुभवावरून जीजीला खात्रीच आहे. बाबीला झोपायला मदत करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे एखादे ओळखीचे गाणे अतिशय लहान आवाजात म्हणणे. 

जीजीने 'शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा ..' सुरु केले. 

बाबी ऐकत होती. "मासा म्हणाला, शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात, पोहत राहीन प्रवाहात...." 
बाबीने विचारले, 'जीजी, माश्याला हात असतात?'

जीजी: 'नाही ग, माश्याला वाटतं आपली शेपटी म्हणजे हातच आहे.'  

गाणं पुढे चालू. ... 

कांगारू म्हणाले, माझे काय? तुझे काय? हा हा हा शेपूट म्हणजे पाचवा पाय!

बाबी म्हणाली,  'कांगारूला पाच पाय असतात?' 
जीजीच्या उत्तराची वाट न बघता पुढचा प्रश्न "कोणाला पाच पाय असतात का?" 

जीजीला वाटलं होतं बाबी झोपलीय, पण बाबींचा मेंदू प्रत्येक इनपुट वर प्रोसेसिंग करतोच आहे! 

जीजी म्हणाली, 'नाही बाबी, कांगारूला आणि इतरांनाही जास्तीत जास्त चारच पाय असतात. दोन किंवा चार. (आत्ताच मिलीपेड, सेंटिपेड बद्दल नको सांगायला) पण कांगारूंची शेपटी पण पायासारखा आधार देते.' 

हे ऐकण्याच्या आधीच बाबीची  ब्रह्मानंदी टाळी लागली म्हणून बरं!